प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढणार?

Foto
 वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून राज्य पिंजून काढणारे व काँग्रेस-राष्ट्रवादीशी अंतर राखून असलेले भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीला दुसरा धक्का दिला आहे. आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक सोलापूरमधून लढण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. तसं झाल्यास त्यांची टक्कर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी होणार असून त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी आज ही माहिती दिली. अर्थात, प्रकाश आंबेडकरांनी त्यास अद्याप दुजोरा न दिल्यानं संभ्रम कायम आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी युती करून बहुजन वंचित आघाडी स्थापन केली आहे. त्यांच्या सभांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांचं विभाजन करण्याची शक्यता असल्यानं प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. मात्र, लोकसभेच्या 12 जागा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्याची अट घालून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची गोची करून टाकली. असं असतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीनं आंबेडकरांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता. प्रकाश आंबेडकर पूर्वी खासदार असलेल्या अकोल्याची जागा सोडण्याची तयारीही दाखवण्यात आली होती. मात्र, आता त्यांनी सोलापूरमधून लढण्याची तयारी केल्याचं समजतं. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग सोलापुरात असल्याचं मानलं जातं. हे लक्षात घेऊनच भारिपनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. 

सोलापूरमधून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक लढवणार आहेत. मागील वेळेस मोदी लाटेत शिंदे यांचा पराभव झाला होता. यावेळी पुन्हा ही जागा काँग्रेसच्या खात्यात येईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना होता. मात्र, अचानक आंबेडकरांचं नाव पुढं आल्यानं काँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker